सोमवती अमावस्या

जेजुरीचा खंडोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत आहे. जर सोमवारी अमावस्या आली तर जेजुरीच्या गडावर सोमवती यात्रेचे आयोजन केले जाते.

सोमवती या दिवशी जेजुरी गडावरून खंडोबा देवाचा पालखी सोहळा कऱ्हा नदीवर प्रस्थान ठेवत असतो. मंदिर प्रदक्षणीनंतर श्री खंडोबा व म्हाळसा देवीची उत्सव मूर्ती पालखीत ठेवण्यात येते. पालखी सोहळ्यात उधळणाऱ्या भंडाराने सगळे वातावरण सुवर्णमय होते. दिर ते कऱ्हानदी हे अंतर सुमारे ७ कि.मी आहे

श्री. खंडेरायाची पालखी जेजुरी गडावरूनत निर्धारित मुहूर्तावर कऱ्हानदी स्नानासाठी प्रस्थान करते.
कऱ्हा नदीवरील रंभाई शिंपीन या ठिकाणी श्री खंडोबा व म्हाळसादेवीच्या उत्सव मूर्तींना कऱ्हा नदीच्या पाण्याने व पंचामृताने स्नान घालून समाज आरती होते.

यानंतर रात्री महाद्वार रस्त्याने पालखी मंदिरामध्ये पोहोचते. रोजमरा वाटून सोमवती उत्सवाची सांगता होते .

यादिवशी गडावरील खंडेरायाच्या दर्शनाला लाखो भाविक येतात.

चंपाषष्ठी

“चंपा षष्ठी” हा उत्सव मार्गशीर्ष महिन्यात शुद्ध षष्ठी च्या दिवशी साजरा करतात. या महिन्यात खंडोबाच्या नावाने महिन्याच्या पहिल्या दिवशी नवरात्र सुरू होते. मणी – मल्ल या दोन दैत्याना पराजित करुण खंडोबाने लोकांना संकटातून बाहेर काढले ते याच दिवशी. म्हणून हि घटना नियमित स्मरणात राहावी, म्हणून हा उत्सव साजरा केला जातो.

चंपा षष्ठी ची नवरात्र म्हणजे सहा दिवसांची असुन मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते शुद्ध षष्ठी असं तिचं स्वरूप असतं. या दिवसात गडावर प्रचंड मोठी यात्रा भरते. हा उत्सव गावोगावी देखिल साजरा केला जातो. अनेक लोककलेच्या माध्यमांतून हा उत्सव ग्रामीण भागात साजरा करतात त्यात जागरण गोंधळ घालून ‘वाघ्या मुरळी’ यांना दान धर्म करणे त्यांना भोजण देणे असे अनेक उपक्रम राबविले जातात.

या दिवशी वांग्याचं भरीत अन् भाकरी असा खंडोबाला नैवद्य केला जातो. यातला काही भाक खंडोबाचे वाहन असलेल्या कुत्र्याला भंडारा लावून खाऊ घालतात. त्याची पूजा करुण तळी उचलून आप्तस्वकीय मंडळी सोबत आनंदाने आरती केली जाते.

मर्दानी दसरा

जेजुरीचा खंडोबा महाराष्ट्रातल्या सर्व जातींचे कुलदैवत आहे. जेजुरीतल्या 27 जाती खंडोबाच्या मानकरी-खांदेकरी आहेत. दसरा सण या सर्वांच्या मानाचाही असतो. अठरापगड जातीचे लोक मानपान आणि धार्मिक विधींसाठी दसऱ्याला गर्दी करतात. यात वीर, कोळी, घडशी, गुरव, धनगर, मराठा, ब्राह्मण, बौद्ध, मातंग, बेरड, चर्मकार, लोहार, मेटकार, नाभिक, परीट, माळी आदी सर्वांचा समावेश असतो. प्रत्येक जातीधर्माचे लोक कोणत्या ना कोणत्या हक्क-परंपरेने गेल्या अनेक शतकांपासून खंडोबाशी जोडलेले आहेत.

दसऱ्याच्या दिवशी सायंकाळी जेजुरी गडावरील पालखी शिलंगणासाठी रमण्याकडे प्रस्थान करते, हा सोहळा प्रेक्षणीय असतो. कडेपठारवरील पालखी रात्री रमण्याकडे प्रस्थान करते लोक कलाकारांच्या गीत संगीताच्या साथीमध्ये हवाईच्या प्रकाशात डोंगर माथ्यावरून जाणारा हा पालखी सोहळा विलक्षण थराराचा असतो. पालखी मार्गात शिलंगणाचे सोने लुटून हा सोहळा रमण्याचे माथ्यावर येऊन पोहोचतो. जेजुरी गडावरील पालखी रमन्यामध्ये डोंगराच्या पायथ्याला विसावते आणि डोंगर माथ्यावरील कडेपठारची पालखी व पायथ्याची जेजुरी गडावरील पालखी दोन्हीकडे दारूकामाचे आतिषबाजीस सुरुवात होते. उत्साहाने भरलेल्या भक्तिमय वातावरणात दोन्ही पालख्यामधील आरशामधून दोन्ही देवांची नजर भेट होते आणि सीमोल्लंघन होते.दसऱ्याला गडावर चालणारी जवळपास अडीच तासांची आतषबाजी डोळ्यांचे पारणे फेडणारी असते.दोन्ही पालख्या परतीच्या प्रवासाला निघतात.

डोंगरदऱ्यांतून वाहून नेली जाणारी जड पालखी भक्तांच्या ताकदीचा कस पाहत असल्याने आणि देवापुढे ताकदीचे खेळ रंगतात म्हणूनही येथील दसरा ‘मर्दानी’ ठरतो.

दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी खंडा स्पर्धा आयोजित केली जाते.

‘पेशवाईच्या उत्तरार्धात स्वराज्याच्या तोफखान्याची जबाबदारी सरदार महिपतराव लक्ष्मणराव पानसे व सरदार रामराव लक्ष्मणराव पानसे यांच्याकडे आली. सरदार पानसे खंडोबाचे भक्त होते. त्यांनी नवसपूर्ती म्हणून 9 शेराची (42 किलो) तलवार (खंडा) आणि कासवाच्या पाठीची मोठी ढाल खंडोबाला अर्पण केली. या खंड्याच्या कसरती गडावर रंगतात. 42 किलोचा खंडा घेऊन जोर काढणे, कसरती करणे, दातांनी खंडा उचलणे असे ताकदीचे प्रकार सादर केले जातात.

पौष पौर्णिमा

सोमवती अमावास्येव्यतिरिक्त प्रत्येक यात्रेत वेगळी परंपरा असते. अशीच ही पौष पौर्णिमा यात्रा होय. पौष पौर्णिमा यात्रा खर्‍या अर्थाने भटक्या विमुक्त जाती-जमातीतील बांधवांची यात्रा मानली जाते. राज्यभरातून विविध ठिकाणांवरून वैदू, वडारी, कैकाडी, बेलदार (पाथरवट), कोल्हाटी आदी आठरापगड जाती-जमातींचे बांधव येथे येतात. देवदर्शनाबरोबरच जागरण गोंधळ, तळीभंडार आदी कुलधर्म-कुलाचार करून आपली वर्षाची वारी करतात.

येळकोट येळकोट…जय मल्हार’ म्हणत लाखो लोकांच्या उपस्थितीत दरवर्षी पौष शुद्ध पौर्णिमेला खंडोबा आणि म्हाळसा यांचा विवाह सातारा येथील पाली मध्ये पार पडतो.

जेजुरीत भरणारी पौष पौर्णिमा यात्रा गाढवांच्या बाजारासाठी (खरेदी विक्री) पुरातन काळापासून प्रसिद्ध आहे. तीन ते चार दिवस दिवस हा बाजार चालतो. जेजुरीच्या खंडेरायाला साक्षी ठेवून गडाच्या पायथ्याला असलेल्या बंगाली पटांगणात शेकडो वर्षापासून येथे राज्यातून व राज्याबाहेरून गावगाड्यातील आलेला बाराबलुतेदार परंपरेतले विविध जातींचे समाजबांधव गाढवांची खरेदी विक्री करतात.

चैत्र पौर्णिमा

चैत्र पौर्णिमा उत्सव खंडेरायाचा महत्त्वपूर्ण मानला जातो.सह्याद्रीच्या कुशीत डाेंगररांगात वसलेले श्रीक्षेत्र जेजुरी येथील खंडाेबा अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणून परिचित आहे. राक्षसांच्या त्रासातून ऋषिमुनींची सुटका करण्यासाठी श्री शंकराने मार्तंड भैरव अवतार येथे धारण केल्याने या ठिकाणास विशेष महत्त्व आहे. चैत्र शुद्ध पौर्णिमेला दुसऱ्या प्रहरी चित्रा नक्षत्र वसंत ऋतू यादिनी शिवशंकरांनी मार्तंड भैरवावतार धारण केला, अशी आख्यायिका आहे.

पूर्वी या ठिकाणाचे नाव ‘जयाद्री’ असे होते. पुढे काळाच्या ओघात त्याचेच ‘जेजुरी’ झाले.

येथे पुरातन काळापासून मोठी यात्रा भरते.राज्याच्या विविध प्रांतांतील बहुजन बांधव व शेतकरीवर्ग मोठ्या संख्येने येथे दाखल होत यळकोट… यळकोट असा गजर करीत भंडाऱ्याची उधळण करीत कुलधर्म-कुलाचार करतात.

माही पौर्णिमा

अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेले जेजुरी मध्ये माघ पौर्णिमा यात्रा निमित्ताने लाखो भाविक जेजुरीत दाखल होतात. यामध्ये मुख्यत: कोळी समाज बांधव आपापल्या खंडोबा देवाच्या पालख्या घेऊन देवभेटीसाठी मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहेत.

माही पौर्णिमा हा म्हाळसा देवीचा जन्मदिन मानला जातो.माघ शुद्ध पौर्णिमेस जेजुरी येथे दोन ते तीन दिवसांची मोठी यात्रा भरते तसेच दर तीन वर्षांनी कोळी समाज बांधव आपापल्या खंडोबा देवाच्या पालख्या घेऊन देवभेटीसाठी जेजुरीत दाखल होतात. कोळीगीतांच्या नृत्यावर नाचत, वाजत, गाजत आणि भंडाऱ्याची उधळण करीत मोठ्या थाटामाटात पालखी देवभेटीसाठी गडावर नेली जाते. या उत्सवाला शिखरी काठी उत्सवही म्हटले जाते.

तसेच संगमनेरकर होलम राजाची शिखर काठी, सुपे ता . बारामती येथील खैरे पाटलांची शिखर काठी आणि महाराजा होळकर यांची जेजुरीतील शिखर काठी या तीन शिखरी काठ्यांना विशेष मान आहे. दरवर्षी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी या तीन शिखरी काठ्यांसह राज्याच्या विविध भागातून आलेल्या प्रासादिक शिखरी काठ्या मुख्य मंदिराच्या कळसाला टेकविण्याचा मान आहे

error: You are not allowed to copy the content!