जेजुरी नगरी ही सह्याद्री पर्वतरांगेत वसलेली एक ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्वाची स्थळ आहे, जी भारताची दक्षिण काशी म्हणून ओळखली जाते. जेजुरीगड हा पर्वत शिवलिंगाच्या आकाराचा असून, १२व्या शतकातील संत नरहरी सोनारांनी याचे वर्णन “मृत्युलोकी दुसरे कैलास” असे केले आहे. तसेच १४व्या शतकातील संत एकनाथ महाराजांच्या ओव्यांत खंडेरायाच्या महतीचे वर्णन आढळते.
पुराणकालापासून जेजुरी नगरीचे खंडोबा म्हणजेच महादेवाचे एक तेजस्वी आणि उग्र स्वरूप मानले जाते. खंडोबाचे दुसरे नाव “मार्तंड भैरव” असून, याचे “मार्तंड” हे सूर्याचे नाव आहे. बहुजन समाजात खंडोबा “मल्हारी मार्तंड” या नावाने प्रसिद्ध आहे. तसेच, त्यांना म्हाळसादेवींचा पती म्हणून “म्हाळसाकांत” असेही म्हटले जाते. मल्लांचा देव असल्याने त्यांचे एक नाव “मल्ल-हरी” म्हणजे “मल्हारी” असे झाले.
जेजुरीच्या खंडोबा देवतेला महाराष्ट्राचे कुलदैवत मानले जाते, मात्र त्यांची ख्याती केवळ महाराष्ट्रातच मर्यादित नसून, संपूर्ण देशभरात, विशेषत: दक्षिण भारतात देखील आहे. जेजुरी ही खंडोबाची राजधानी मानली जाते, जिथे देशविदेशातून भाविक मोठ्या संख्येने येतात. जेजुरीमध्ये सर्व भाविक, गरीब-श्रीमंत, रंजले-गांजले अशा सर्व स्तरांतील लोक एकत्र येऊन श्रद्धा, भक्ती आणि सेवेचे दर्शन घडवतात.
श्री खंडोबा मंदिराचे बांधकाम इ. स. 1608 मध्ये पुर्ण झाले. मंदिरा भोवतीचा सभामंडप तसेच अन्य कामे ‘ राघो मंबाजी ‘ या मराठा सरदाराने इ. स. 1637 मध्ये पूर्ण केली. मंदिराच्या परिसरात असणाऱ्या इतर काही वास्तू होळकरांनी बांधल्या. इ. स. 1742 मध्ये त्यांनी मंदीरात दगडी खांब उभे केले. काही कालांतराने मंदिराच्या सोभवतीची तटबंदी व पाण्याच्या तलावाचे काम देखील त्यांनी इ.स. 1770 पूर्ण केले.
होळकर घराण्याचे संस्थापक मल्हारराव होळकर यांचा खंडोबावर गाढा विश्वास होता. त्यांच्या सुभेदारीच्या काळात त्यांनी गडाच्या उत्तर भागातील दरवाजाचे काम करवले. होळकर घराण्याच्या धर्मनिष्ठ अहिल्याबाई होळकर यांनी जेजुरी नगरीच्या जडणघडणीत मोठा वाटा उचलला. त्यांच्यामुळे होळकर तलाव, चिंचेची बाग, आणि चिलावती कुंड यांसारख्या अनेक वास्तूंची निर्मिती झाली.
गडावर जाण्यासाठी ४५० पायऱ्या आहेत, ज्यांना “९ लाख पायरी” म्हटले जाते. गडावर १८ कमानी आणि ३०० दिपमाळा आहेत, ज्यांच्या देखभालीसाठी दानशूर भक्तांचा सहभाग आवश्यक आहे.
